Nibandh Lekhan In Marathi – यशस्वी निबंधलेखनासाठी प्रभावी मार्गदर्शिका

प्रिय विद्यार्थी मित्रांनो !

Nibandh Lekhan In Marathi : तुमच्या निबंधाचा दर्जा हा मागील परीक्षेपेक्षा वरचा असला पाहिजे. निबंधाची मांडणीही उत्तम हवी आणि त्यातील विचारांची खोलीही चांगली हवी. निबंधाच्या प्रश्नाचा आपणाला तसा वर्षभर क्रमिक पुस्तकासारखा उदा. गद्यपद्य वेचे – अभ्यास करता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा कल निबंध लिहिताना सुचेल ते, जमेल तसे आणि उगीच भारूड लिहिण्याकडे असतो. हे बरोबर नाही.

निबंधाच्या प्रश्नाचाही आपण वर्षभर अभ्यास करू शकतो ! कसा ? तर आपण वर्षभर वृत्तपत्रांचे (कमीत कमी एक- उदा. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, तरुण भारत, नवशक्ती, सकाळ इ.) वाचन ठेवले पाहिजे. अग्रलेखात विषय प्रतिपादन कसे असते, उदाहरणे कशी दिलेली असतात, त्याचा प्रारंभ, शेवट कसा केलेला असतो हे आपण नीट पाहिले पाहिजे. अग्रलेख म्हणजे वैचारिक लेखाचा-वैचारिक निबंधाचा उत्तम नमुना असतो. परीक्षेत एकतरी निबंधाचा विषय प्रचलित विषयावर आधारित असतो. त्या प्रचलित विषयाची माहिती आपणास वृत्तपत्र वाचनातून होते, अग्रलेखांतून होते. यावर उल्लेखिलेल्या वृत्तपत्रांच्या रविवारच्या आवृत्ती तर आपल्या वाचनात जरूर हव्यात.

विद्यार्थी मित्रांनो, वाचनाच्या बरोबर मोठमोठ्या लेखकांचे निबंधसंग्रह व लघुनिबंधसंग्रह आपल्या वाचनात असावेत. वर्षभर जमतील तेवढे संग्रह आपण वाचावेत. त्यामुळे आपल्याला लघुनिबंधाची पद्धती कळते. लघुनिबंधाचा प्रश्न परीक्षेत निश्चितपणे असतो. लघुनिबंधाची पद्धत जर आपणाला कळली तर आपण लघुनिबंध लिहू शकतो अन्य निबंध (उदा. ललित, वैचारिक) वाचनात येतील तर आपली भाषा सुधारेल व निबंधाची मांडणी कळेल. निबंध कोणताही असो वैचारिक, लघुनिबंध वा अन्य, त्यांचा प्रारंभ आकर्षक, मध्य लक्षात राहणारा व शेवट टोकदार हवा. मुद्यांची मांडणी क्रमवार हवी. विषय नीट विकास पावत गेला पाहिजे. कळीतून फुल फुलावे तसा. या सर्वांबरोबर विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आपले लेखन शुद्ध हवे. ज्या विद्यार्थ्यांचे लेखन शुद्ध नसते त्याचे चांगले विचारही परीक्षकांवर परिणाम करू शकत नाहीत यासाठी विद्यार्थ्यांनी आज सहज उपलब्ध होणारी (नव्या) शुद्धलेखनाची नियमपुस्तिका घेऊन अभ्यासली पाहिजे व दररोज पाचदहा ओळी (पुस्तकात बघून) लेखन काढले पाहिजे. ही सूचना प्राथमिक स्वरूपाची वाटेल. पदवीच्या विद्यार्थ्यांना याची काय गरज ? असाही प्रश्न कोणी उपस्थित करील. पण हीच पद्धत अत्यंत गुणकारी आहे. निश्चितपणे उपयुक्त आहे. असा निर्वाळा अनेक मान्यवर शिक्षकांनी दिलेला आहे. आज आपण पाहतो, मराठी आपली मातृभाषा खरी पण ती आपणाला शुद्ध लिहिता येत नाही. इंग्रजी शङ्कांच्या स्पेलिंगकडे आपण लक्ष देतो, मग मराठीच्या शुद्धलेखनाकडे आपण लक्ष द्यायला नको का ? विद्यार्थी मित्रांनो, हे हितगुज, या स्थूल सूचना खास लक्षात घ्या. त्यांचा तुम्हाला परीक्षेत निश्चितपणे उपयोग होईल.

हे आर्टिकल ही वाचा : Prayog In Marathi – मराठी व्याकरण प्रयोग

WhatsApp Group Join Now
Nibandh Lekhan In Marathi

■ निबंधाची वर्गवारी कशी करता येईल ?

महत्वाचे निबंध प्रकार आणि त्यातील वैशिष्ट्ये – Nibandh Lekhan In Marathi

मराठीच्या प्रश्नपत्रिकेत प्रामुख्याने चार निबंध प्रकार विचारले जातात:

लघुनिबंध – (उदा. “अफवा”) या निबंधाचा विषय साधा असतो, परंतु त्यातून जीवनातील तत्वे व्यक्त करणे अपेक्षित असते.

विवेचनात्मक निबंध – (उदा. “आजचा विद्यार्थी – असावा किंवा असतो”) या निबंधात विचारांना विविध उदाहरणांसह स्पष्ट करावे लागते, ज्यासाठी गंभीर व प्रौढ भाषा आवश्यक असते.

वर्णनात्मक निबंध – (उदा. “माझा आवडता साहित्यिक”) या निबंधात मुद्देसुद, आकर्षक वर्णनासोबत त्या व्यक्तीची किंवा स्थळाची छाप देखील दिसून येते.

वाङमयीन निबंध – (उदा. “साहित्यातील अश्लीलता”) या निबंधात साहित्यिक विषयांवर आधारित विचार मांडले जातात, ज्यामध्ये वाङमय चळवळींचा संदर्भ व साहित्यिकांची मते उद्धृत केल्यास चांगला परिणाम होतो.

वर उल्लेखिलेले निबंधाचे हे चार प्रकार हाताळत असताना त्या प्रत्येक प्रकारागणिक काही वैशिष्ट्ये लक्षात ठेवली पाहिजेत. विवेचनात्मक निबंधात विवेचन ही गोष्ट महत्त्वाची असते. उदा. सक्तीचे लष्करी शिक्षण आवश्यक आहे का ? हा निबंधाचा विषय असेल तर त्यातील विचारांचा आपणास विविध उदाहरणांच्या साहाय्याने विस्तार करावा लागतो. ही उदाहरणे समर्पक हवीत. या निबंधाची भाषाही खेळकर नव्हे तर गंभीर हवी. महापुरुषांच्या लेखनातील विचार-शलाकांचा अथवा सुभाषितांचा वापर करता आल्यास फारच उत्तम. या वैचारिक निबंधात कधी कधी वादग्रस्त प्रश्नही, निबंधाचा विषय म्हणून येऊ शकतो. उदा. विज्ञान व मानवी सुख. या ठिकाणी विद्यार्थ्यास अनुकूल अथवा प्रतिकूल कोणतीही भूमिका घेता येईल. अशा वेळी त्या विषयाची व्याख्या, आपण घेतलेल्या बाजूचे मंडन, उलट बाजूचे खंडन आणि समारोप या चार टप्प्यांनी जावे लागेल. थोडक्यात, विशिष्ट विचारांचे सोदाहरण प्रौढगंभीर भाषेत विवेचन म्हणजे वैचारिक किंवा विवेचनात्मक निबंध.

 वर्णनात्मक निबंधात दिलेल्या विषयाचे सुबोध, सुसंगत आणि आकर्षक वर्णन हवे. एखाद्या स्थळाविषयी आपण निबंध लिहीत असू तर त्या स्थळाचे तपशीलवार वर्णन जसे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या स्थळाने आपल्या मनावर उमटवलेला ठसाही सांगणे आवश्यक आहे. जसे प्रवासवर्णनात प्रवासाच्या वर्णनाबरोबर प्रवासी मनाच्या वर्णनालाही महत्त्व आहे, असे आपण मानतो. ऐतिहासिक व्यक्तीविषयी लिहावयाचे असेल तर तिच्या जीवनातील प्रसंगांची मांडणी अशी करावी की, ज्यातून त्या व्यक्तीचे कर्तृत्व, मोठेपण, गुणसंपदा, विभूतित्त्व आपल्या मनावर ठसावे. ‘माझा आवडता लेखक’ यावर आपण लिहीत असू तर त्या लेखकाच्या साहित्य संपदेचा परामर्श घेताना, तो साहित्यिक आपणास का आवडतो याचेही विवेचन करावे. वर्णनात्मक निबंधात रंगतदार आणि नीटस वर्णनास महत्त्व आहे.

वाङ्मयीन निबंधाचा विषय एकतर वाङ्मय तत्त्वविषयक असतो. (उदा. साहित्यातील अश्लीलतेचा प्रश्न.) किंवा वाङ्मयप्रकारनिष्ठ असतो (उदा. आजचे मराठी नाटक, दलित साहित्य, ग्रामीण कथा, इ.) अशा वेळी त्या विषयाचे सोदाहरण आणि सुसंगत विवेचन या निबंध प्रकारात आवश्यक आहे. या निबंधातून आपली साहित्यविषयक अभिरुची प्रकट होते. वाङ्‌मयविषयक जाण प्रकट होते. या निबंधाची मांडणी करताना वाङ्‌मयीन चळवळींच्या घडामोडींचा आपण उल्लेख केल्यास उत्तम ठरते. आपण जे विधान करू, त्याचा पाठपुरावा करणारी काही उदाहरणे आपण जरूर दिली पाहिजेत. असा हा निबंध म्हणजे छोटासा समीक्षा लेखच असतो म्हणा ना! या निबंधलेखनात आपण विषयाच्या संदर्भात वाङ्मयाभ्यासकांची, समीक्षकांची, मान्यवर लेखकांची काही मतेही उद्धृत केल्यास आपले विवेचन अधिक प्रभावी होते.

निबंधाचा चौथा प्रकार म्हणजे लघुनिबंध. लघुनिबंधाचा विषय अत्यंत साधा असतो. पण त्यातूनच शेवटी जीवनाचे एखादे तत्त्व शोधावयाचे असते. उदा. ‘अफवा’ तत्त्व : अफवा वाईट असे आपण सगळे जण म्हणतो पण अफवा उठविण्यात आणि ऐकण्यात गंमत असते. कारण अफवेमागे सामान्य माणसाची कल्पकता उभी असते आणि कल्पकतेसारखे आपले अपत्य कोणाला प्रिय नसते ? लघुनिबंधाची सुरुवात एखाद्या प्रसंगाने करावी. तो प्रसंग मांडून निबंधाचा विषय जणू त्यातून सुचला आहे असे दाखवावे. यासाठी फडके, खांडेकर, काणेकर, अदवंत यांचे लघुनिबंध जरूर पाहावेत. त्या विषयाचा विस्तार करताना एकदोन छोट्या गोष्टी सांगाव्यात. आख्यायिका, दंतकथा, गंमतीचे प्रसंग, चुटके यांचा विषयानुरूप वापर केल्यास लघुनिबंधाची रंगत वाढत जाते. लघुनिबंधाची एकूण भाषा वैचारिक निबंधाच्या अगदी उलट हवी. ती खेळकर, गंमतीदार, गप्पाटप्पांची हवी. चांदण्या रात्री घराच्या गच्चीवर एखाद्या बहुश्रूत स्त्रीशी गप्पा मारताना जो अनुभव येतो तो अनुभव लघुनिबंध वाचनाने वाचकाला आला पाहिजे.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो ! यापुढे चार निबंध प्रकाराची एकूण पाच उदाहरणे लिहून दाखविली आहेत. नंतर काही निबंध विषयांचे मुद्दे दिले आहेत. त्या मुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतः निबंध लिहून पाहावेत. त्यानंतर या चार प्रकारात येऊ शकणाऱ्या संभाव्य निबंध विषयांची सूची दिली आहे.

हे आर्टिकल ही वाचा :- Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार

१.लोकशाहीतील निवडणुका

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) लोकशाही ही राज्यपद्धती नव्हे. ती एक जीवनपद्धतीच आहे. तिच्यामुळेच व्यक्तीवा सर्वांगीण विकास होतो. स्वातंत्र्य, समता लाभते.
  2. लोकशाहीत लोकांचे सरकार असते. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सरकार असते. म्हणून लोकशाहीत निवडणुकीस फार महत्त्व आहे. निवडणुका म्हणजे सुप्त स्वरूपाची अमोघ शक्तीच होय.
  3. जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या या निवडणुका खुल्या व मोकळ्या वातावरणात झाल्या पाहिजेत. दाब, दडपण, आग्रह, धमक्या इ. गोष्टी त्यात येता कामा नयेत. त्या आल्या की निवडणुकीचा आत्माच हरवल्याप्रमाणे होईल.
  4. त्याचप्रमाणे निवडणुकीस उभे असलेले उमेदवारही पक्षीय दृष्टीने, प्रादेशिक, जातीय वा इतर कोणत्याही दृष्टीने उभे करू नयेत. त्याचे चारित्र्य शुद्ध असावे. उमेदवार समाजसेवी असावा. निःस्वार्थी व आदरणीय असावा.
  5. आजच्या लोकशाहीतील निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्याचा अभ्यास करून मत देण्याऐवजी इतर गोष्टींनाच प्राधान्य देऊन मतदान केले जाते. त्यातच भारतातील बरीचशी जनता अशिक्षित असल्याने ती आपला उमेदवार तावून सुलाखून निवडण्याऐवजी अंधानुकरणाने मत देऊन टाकते. त्यामुळे अनेक वाईट गोष्टी निर्माण होतात. म्हणून सुबुद्ध, जाणकार, सुशिक्षित असा मतदार असणे अत्यंत आवश्यक !
  6. तरीही हुकूमशाहीतील अत्याचार व मुस्कटदाबीपेक्षा या निवडणुका लाखपटीने चांगल्याच म्हटल्या पाहिजेत. भारतात तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका होत असूनही तसे विशेष नामुष्कीचे प्रकार घडत नाहीत. घडले तरी दिवसेंदिवस त्याचे प्रमाण कमी होत जाणार आहे.
  7. म्हणून आजच्या तरुणाने उद्याचा मतदार म्हणून आतापासूनच देशाच्या राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. उमेदवारांविषयीची मते पक्की केली पाहिजेत. पक्षापक्षांतील भेद व निष्ठा ओळखल्या पाहिजेत. देशाला कोणत्या व कोणाच्या नेतृत्वाची गरज आहे हे ओळखले पाहिजे आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने त्या निवडणुका झाल्या पाहिजेत, याचाही आग्रह धरला पाहिजे.

२. रंगल्या गप्पा अशा

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) विश्रांती व विरंगुळा या माणसाच्या स्थायी गरजा आहेत. त्याखेरीज माणूस परिपूर्ण असे जीवन जगणारच नाही.
  2. या गरजांचे अनेक प्रकार समाजात निर्माण झालेले आहेत. विविध कलांचा आस्वाद, चित्रपट, वाचन, बागकाम, घरकाम यामुळेही माणसाला हवा असणारा विरंगुळा मिळतो
  3. त्यापेक्षाही जिवलग मित्रांच्या समवेत मनसोक्त व मुक्तपणे गप्पा मारल्याने जी लज्जत येते त्याला तोड नाही.
  4. अशा या गप्पा म्हणजे आपले आपण सगळे मनच खुले करणे होय. हे आपण आपला आविष्कार करण्यासारखे असते. त्यामुळे आपले विशुद्धीकरणही होते. बरे वाटते.
  5. या गप्पा स्वैर असतात. त्यात नाना विषय येतात. नटीपासून आमटीपर्यंत आणि घरापासून देवघरापर्यंत आपण बोलत असतो. त्यामुळे एक वेगळी धुंदी येते. आपले मानवी जीवनाचे ज्ञान वाढते. अवलोकन वाढते. ज्ञानात भर पडते. मनाची चांगली करमणूक होते. माणसे जोडली जातात. ती टिकविली जातात. त्यांच्या अंतःकरणात शिरून प्रेम-जिव्हाळा निर्माण करता येतो. एवढे सारे फायदे गप्पांमध्ये आहेत.
  6. त्याप्रमाणे आणखी एक फायदा म्हणजे आपण या तृप्त व मनसोक्त गप्पांच्या प्रवाहात पडलो की रोजच्या व्यथा-वेदना पार विसरून जातात. काळज्या, दुःखे दूर पडतात. जीवनाची खंत, समाजाची अवहेलना, कौटुंबिक विवंचना मनात साचत नाही आणि माणूस त्या क्षणापुरता तरी एका उदात्त व विशुद्ध अशा उच्चतम वातावरणात विहार करीत असतो. त्यामुळेच त्याला जगण्याचे प्रेम वाटायला लागते. गप्पा म्हणजे जीवनाचे टॉनिकच आहे. जीवन जगण्यामागील प्रेरणाच आहे असे म्हटले पाहिजे.
  7. मात्र त्यातही पथ्य हे पाळलेच पाहिजे. आपल्या गप्पांत निंदा-नालस्ती-टवाळकी येता कामा नये. जीवनातील शाश्वत मूल्यांची अवहेलना होता कामा नये. गप्पांत येणारी माणसे पारखूनही घेतली पाहिजेत. तसेच त्यातून संगतीने नसलेली व्यसनेही लागणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे. ही पथ्ये पाळल्यावर मग दुसऱ्या करमणुकीची गरजच नाही.

३. श्रमाची थोरवी :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) प्रत्येक माणसाला आपण आहे त्यापेक्षा थोर व्हावे असे वाटत असते. माणसाचा देवमाणूस होण्याची धडपड हाच मानवी जीवनाचा अर्थ असतो.
  2. त्यासाठी मात्र मानवाला श्रमाची उपासना केली पाहिजे. श्रम हाच परमेश्वर मानला पाहिजे. पाश्चात्य राष्ट्रांनी याच परमेश्वराची मनापासून उपासना केली. म्हणूनच ते आज संपन्न व तृप्त जीवन जगत आहेत. रक्ताचे पाणी केल्याखेरीज कोणत्याही स्थितीत जीवनानुकूल असा बदल घडत नसतो.
  3. ज्या ज्या व्यक्तींनी या श्रमदेवतेस मानले ते ते पुरुष लोकोत्तर ठरले आहेत. आपल्या देशातील कोणत्याही थोर नेत्याचे चरित्र आपण पाहिले तरी मोठेपणाच्या तळाशी त्यांची अखंड श्रमसाधना असलेलीच आपणास दिसून येईल.
  4. आज मात्र दिवसेदिवस श्रमास विशेषतः शारीरिक श्रमास कमी लेखण्याची एक वाईट प्रथा पडत चाललेली आहे. जो चार अक्षरे शिकलेला आहे. त्याला स्वतःचीच कामे करायला लाज वाटते. हलकी-सलकी कामे करण्यामध्ये अप्रतिष्ठा झाली असे मानतो. या विकृत कल्पनेचा परिणाम समाज, देश व व्यक्तिगत जीवनावर होतोच होतो. म्हणून आपल्या विकासासाठी मनगटावर भिस्त ठेवली पाहिजे.
  5. आणखी एका दृष्टीने या श्रमाची थोरवी आहे. ती म्हणजे जो माणूस श्रम करतो, भरपूर श्रम करतो, त्याचे आरोग्य उत्कृष्ट राहते. त्याला भूक लागते. खाल्लेले पचून जाते. झोप लागते आणि कोणत्याही रोगाचा त्रास त्याला होत नाही. त्याची प्रतिकारशक्ती वाढलेली असते. त्यामुळे अशी माणसेच जीवनाचा खऱ्या अर्थाने पूर्ण आस्वाद घेऊ शकतात.
  6. म्हणून कोणतेही श्रम करण्यात लाज न वाटणे, सातत्याने श्रम करणे, दुसऱ्यासाठी श्रम करणे, केलेल्या श्रमाची झीज भरून काढण्या चीही दक्षता घेणे, हीच जीवनाची एकमेव प्रेरणा मानली पाहिजे.

५. आजच्या विद्यार्थ्यांचे मनोगत

आजचा संतप्त तरुण / आजच्या तरुणांच्या व्यथा : – Nibandh Lekhan In Marathi

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) आपल्या देशातील आजच्या तरुणांविषयी सध्या फार मोठी चर्चा चालू आहे. त्यांची विध्वंसकवृत्ती, ज्ञानाकडे फिरवलेली पाठ, त्यांचे दुभंगलेले आणि अश्रद्ध जीवन, त्याची बारीक-सारीक गोष्टीसाठी पदोपदी होणारी जाळपोळ, संप, घेराव, निदर्शने, देश, धर्म, समाज याविषयी कमी झालेले प्रेम या गोष्टी आज चिंतनीय झालेल्या आहेत.
  2. तसे म्हटले तर वरील गोष्टींत सत्यांश आहे. आजचा तरुण हातात पुस्तके घेण्याऐवजी मशाली घेतो, यात शंका नाही. पण अशा गोष्टी करण्यास का उद्युक्त होतो, हेही आपण पाहिले पाहिजे.
  3. आजचा तरुण जेव्हा आजूबाजूच्या समाजात वावरतो-जगतो तेव्हा त्याला काय दिसते ? समाजनीती रसातळास गेलेली आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी, दंभ, ढोंग या रोगांनी आजचा समाज पार किडलेला आहे. ज्याच्या पायाचे तीर्थ घ्यावे असा आदर्श नेता त्याला दिसत नाही. सर्व चीड येणाऱ्याच गोष्टी तो पदोपदी पाहतो. त्यामुळे त्याचा चांगल्या गोष्टींवरील विश्वासच पार उडून जातो आणि मग तोडमोड करायला धजावतो.
  4. समाजाप्रमाणे राजकारणातही हेच चित्र दिसते. तेथेही त्याचे कोवळे मन करपून जावे असे दिसते. केवळ राजकीय डावपेचापोटी मूर्खत्वाचे निर्णय घेतले जातात. तेथेही दादागिरी, झब्बुगिरी, खाबुगिरी आहेच. मग तरुणांनी का भडकू नये ?
  5. शिक्षणात राजकारण येत चालले आहे. विद्यापीठे ही नुसती पीठे झाली आहेत. आजच्या शिक्षणाचा व समाज गरजांचा समन्वय नाही. ते निरर्थक आहे. साचेबंद आहे. अनेक तरुणांना खेळ, ग्रंथ, निवास, मार्गदर्शन, सहवास व दर्जेदार शिक्षण मिळत नाही. वशिल्याने ढ पोरे पहिल्या वर्गात येतात. मोठमोठ्या पदावर आरूढ होतात. ज्ञानातही शॉर्टकटस् निघत आहेत. निष्क्रिय प्राध्यापक आहेत. या साऱ्यांचा परिणाम तरुणांच्या मनावर होतो. त्याचे तरुण रक्त तापते, भडकते व भावविवश होऊन वाटेल ते करते.
  6. त्यातच बेकारीचा भस्मासूर आहे. शिकून बाहेर पडल्यावर उपासमार घडते. गतिशील जीवन, बकाल वस्ती, जीवनाची ओढग्रस्त अवस्था, नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या मातापित्यांचे त्यांना संस्कार न लाभणे, जीवनाची बदललेली मूल्ये व आदर्श या साऱ्यांचा भडक भीषण दृश्य परिपाक म्हणजे आजचा संतप्त तरुण. त्याचा विचार वरील साऱ्या गोष्टींचा विचार करूनच केला पाहिजे.

६. बोलपटगृहे बंद पडली तर :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) आजच्या घाईगर्दीच्या व सुखदुःखाच्या जीवनात चित्रपटास फार मोठे स्थान आहे. जीवनातील दुःखापासून चार क्षण दूर जाण्याचे व करमणूक करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे.
  2. बोलपटगृहे बंद पडली तर माणूस करमणुकीवाचून वेडा होईल. त्याला ती आवश्यकच आहे. त्याच्या श्रमाचा परिहार होणारच नाही आणि बोलपट हाच त्यातल्या त्यात सर्वात स्वस्त अशी करमणूक आहे..
  3. एवढेच नव्हे तर बोलपट हे समाजशिक्षणाचे थोर साधन आहे. बोलपटगृहे बंद झाली तर समाजाला मिळणारे हे शिक्षण थांबेल. अनन्य साऱ्या साधनांपेक्षा बोलपटाचे साधन फार श्रेष्ठ असे आहे. त्यास आपण वंचित होऊ.
  4. त्याचबरोबर देशाचेही फार मोठे नुकसान होईल. या धंद्यात आज अनेक कोटी रुपयांचे भांडवल आहे. अनेक लक्षांचे परकीय चलन मिळते. हजारोंना काम मिळते. बोलपटगृहे बंद झाली तर या साऱ्यावर गदा येईल. देशाचे नुकसान होईल.
  5. शिवाय हा मानवाच्या आत्म्याचा आविष्कार करण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. कलेतून मानव आपल्या आत्म्याचे, भावनांचे प्रकटीकरण करीत असतो. बोलपटगृहे बंद झाली तर हा आत्मा व्यक्त होणार नाही. मानवी जीवन संपन्न होणार नाही.
  6. पण आजचे चित्रपट पाहिल्यावर असे वाटते, की बोलपटगृहे बंद झाली तर ती एक उपकारक घटना ठरेल. ती कोणत्याच दृष्टीने समाजोपयोगी नाही. ते ज्ञानप्रसार करीत नाहीत. उच्चतम व श्रेष्ठ असा सौंदर्याविष्कार करीत नाही. म्हणून हे चित्रपट म्हणजे निरुपयोगी अजागळासारखेच आहेत.
  7. त्याहीपेक्षा आज ते चित्रपट बंद व्हावेत असे वाटते, याचे कारण ते आजच्या समाजाला-विशेषतः तरुण मनाला बिघडवीत आहेत. प्रेमाचे भडक चित्रण, मारामारी, पळापळी, खोटे आभासमय चित्रण, स्वप्नाळू, अवास्तव वातावरण, प्रीतीविषयक विकृत कल्पना, बाई-बाटली यांनाच प्राधान्य देणारे असे हे चित्रपट आमच्या तरुणांना निष्क्रिय बनवतात. प्रणयाखेरीज अन्य मूल्य नाही असा संदेश देतात. त्यांना स्वप्नाळू बनवतात व त्यामुळे राष्ट्रीय हानी होते. म्हणून ही हानी टाळण्यासाठी बोलपटगृहे बंद झाली तर ते एक मोठे वरदानच ठरेल.

६. ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) कविवर्य तांब्यांच्या कवितेतील ही ओळ आहे. उदास व खिन्न मन झालेल्या मनास त्यांनी त्या कवितेत उपदेश केला असून त्या अनुषंगाने मानवी जीवनासच संदेश दिलेला आहे.
  2. जीवन म्हटले की आशा-निराशा, सुख-दुःख, स्वप्ने-आकांक्षा ही येणारच. माणसाला आपल्या अपेक्षेप्रमाणे सारे घडले की, कमालीचे समाधान वाटते. पण मनाला दुःख झाले की, त्याला जीवन नको नकोसे वाटते. मन उदास, खित्र, व्यथित बनते. त्या वेळी तांबे म्हणतात –
  3. अंधार-दुःख असले म्हणून उदास बनण्याचे कारण नाही. कारण ती एक जीवनाची अवस्थाच असते. ती फार काळ टिकत नसते. अंधार असताना देखील आकाशीचा चंद्र दुःख न करता प्रकाशमान झालेला असतोच ना ? त्याला अंधाराची जशी खंत वाटत नाही; त्याप्रमाणे आपणही या दुःखाच्या सागराहून सुंदर व सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  4. किंबहुना दुःख हेच मानवाला परिपूर्ण करते. विशुद्ध बनविते. अंतर्मुख करते. म्हणून त्याचा खेद करण्याचे काहीही कारण नाही.

७. ओ हो ! पावसाळा आला ! :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) जून महिन्यातला पहिला आठवडा नवागतांचे स्वागत करणारा. कॉलेज सुरू होतात. पावसाळाही याच वेळी येतो.
  2. दिवसभर अंगाची लाहीलाही होत होती. जेवणानंतर विश्रांती घेणेही अशक्य झाले. घरातील वर्षभर धूळ खात पडलेल्या छत्र्या परत झटकल्या गेल्या.
  3. सायंकाळी तर वातावरण जास्त शांत होते. ‘काय उष्मा हा !’ शेजारचे आप्पा म्हणाले. पण नंतर आकाशात ढगांची गर्दी जमली. बिजलीने सलामी दिली. क्षणार्धात जलधारांचा वर्षाव झाला.
  4. सकाळी उठलो तो प्रसन्न मनाने. पृथ्वी सुस्नात झाली होती. तिला नवे रूप अन् नवचैतन्य प्राप्त झाले होते. नूतनपणा अन् जिवंतपणा तिच्या शरीरावर खुलून निघाला होता. मातीचा सुगंध धुंदी आणत होता. सुखाने-आनंदाने जीव गुदमरत होता.
  5. असा पावसाळा येतो. रस्त्यावरून पाणी वाहात होते. लहान मुलांचा उत्साह अन् उल्हास उतू चालला होता, या नव्या पाण्याच्या स्पशनि मन पुलकित होत होते.
  6. नवीन जीवनाची, शेतकऱ्यांना रातंदिन अन् कार्यप्रवण करण्याची नांदी देणारा, सर्वांच्या मरगळलेल्या मनाला उल्हसित करणारा असा हा पावसाळा.
  7. पावसाळा म्हणजे परमेश्वराच्या वत्सलतेचा मूर्तिमंत आदर्श. पावसाळा म्हणजे जुने जीर्ण, सडके-किडके नष्ट करणारा सेवक. पावसाळा म्हणजे मातीबरोबरच मनाला सौंदर्याचे अंकुर फोडणारा जादूगार. त्या ओल्याशा गार सरीतील परमेश्वरी करुणा रोमरोमांत शिरली की, ‘तुझे नि माझे एकच नातें’ याचा साक्षात्कार होतो. त्यामुळेच प्रा. फडक्यासारख्यांना सर्वांत पावसाळा अधिक आवडतो. पु.ल. देशपांड्यांच्या काकाजीला तर या पावसाळ्यात अपूर्व संगीत सापडते.

८. चांदण्यातील सहल :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) परीक्षा संपली अन् लगेच सहलीचा कार्यक्रम आखला गेला. कधी नाही ते आम्हा बारा मित्र-मैत्रिणींचे चांदण्यातील सहलीविषयी एकमत झाले.
  2. नावेत बसून ही सहल करावयाची ही उपसूचनाही एकमताने मंजूर झाली. ‘विजय लाँच भाड्याने ठरविली.’ तेथून दोन मैलांवरील एका बेटावर जाण्याचे ठरले होते.
  3. फराळाचे डबे भरून बरोबर आठ वाजता आम्ही सर्व जण बंदरावर पोहोचलो. आमच्या लाँचचा भोंगा वाजला नि टाळ्या पिटून आम्हीदेखील आमच्या आगमनाची वर्दी दिली.
  4. पौर्णिमेची रात्र. समुद्राला भरती आलेली. निरभ्र आकाश नि त्याच्या सौंदर्यात भर घालणारा चंद्र अंगांगावर चांदणे बरसत होते. समुद्रपर्यटन निषिद्ध मानणाऱ्या पूर्वजांचे हसू आले.
  5. गाण्याची मैफल रंगली. बासरीचे सूर हृदयाचा ठाव घेऊ लागले. आमच्या एका रसिक मित्राने कविता म्हटली, “मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी.”
  6. तेथून आम्ही एका बेटावर गेलो. तेथे फराळाचा मोठ्या मजेने कार्यक्रम आटोपला. एकंदर वातावरण प्रसन्न अन् खेळकर होते. विनोदाची कारंजी उडत होती. घड्याळे ही कारकुनांसाठी असतात. कवीसाठी नसतात. याची प्रचिती आली.
  7. पहाटे तीनला घरी आलो. आपण जागरण केले यावर विश्वासच बसेना अशी ही स्वप्नवत भासणारी चांदण्यातील सहल. जीवनाला जीवन देणारी शद्वातील चैतन्य- साक्षात्कार करणारी परमेश्वराच्या अपूर्व सौंदर्याचा प्रत्यय देणारी.

परीक्षा केंद्रावरील पंधरा मिनिटे

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) परीक्षा केंद्र अन् लग्नाचा मांडव यात काही बाबतीत साम्य आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. पेपर सुरू होण्याअगोदरच्या पंधरा मिनिटापूर्वीची विद्याथ्या के मनःस्थिती अन् मंगलाष्टके सुरू होण्यापूर्वी बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवधूची मनःस्थिती एकच.
  2. या पंधरा मिनिटांत; कितीही अभ्यास केलेला विद्यार्थी असला तरीसुद्धा तो बावरतोच. विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलेले लोक मायेच्या पोटी त्याला धीर देत असतात.
  3. एखादा प्रश्न आपण खूप तयारीने अभ्यासिला आहे तोच यावा अशी हुरहूर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. मनातून प्रत्येक जण घाबरलेला असतो पण वरवर एकमेकांना धीर अन् दिलासा देत असतात.
  4. घंटा वाजते. अन् एकमेकांचा निरोप घेतला जातो. त्याच त्याच सूचनांची पुनरावृत्ती केली जाते. विद्यार्थ्यांचे मन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी अधीर अन् उत्सुक झालेले असते.
  5. निरीक्षक प्रत्येक जण नीट बसला आहे का हे पाहतात. अन् कुणाची काही अडचण आहे का तेही विचारतात.
  6. उत्तरपत्रिका वाटताना निरीक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव असतो. दुसरी बेल वाजते अन् प्रश्नपत्रिका वाटल्या जातात. विद्यार्थ्यांच्या हृदयाचे ठोके आता धीरे धीरे पडू लागतात. परीक्षा हॉलमध्ये शांतता निर्माण होते.
  7. पेनच्या साहाय्याने देवाचे नाव घेऊन विद्यार्थी पेपरवर लिहू लागतात. ‘वर्षभर’ तर विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची अवकळा उतरलेली असते.
  8. निरीक्षक अलिप्तपणे त्यांच्याकडे पाहतो अन् तीन तास कधी संपतील या विचारात हॉलमध्ये फेऱ्या घालू लागतो.
  9. आणि लग्न मंडपाप्रमाणे गजबजलेला हा भाग क्षणार्धात निपचित होतो. वाचा गेलेल्या माणसासारखी धडधडणारी हृदये वेगळ्या अर्थाने धडधडत असतात. निरोप देण्यासाठी-धीरासाठी आलेली माणसेही पेपर सुरू होताच घेतलेला मुखवटा टाकून देतात अन् उत्साहाचे ते केंद्र विषण्णता, उदासीनता आणि गंभीरता याचे आगर बनते. माणसाला गंभीर करणारी अन् तितकीच अस्वस्थ करणारी आजच्या युगातील पुन्हा पुन्हा दिसणारी गोष्ट ही परीक्षा.

९. रेल्वे स्थानकावर :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) रेल्वे स्थानकावर पाहुण्यास व मित्रास पोहोचवण्यास आपण जात असतो, पण रेल्वे स्थानक पाहण्यासाठी एकदा अवश्य जावे, ते दृश्य खरोखरच मोहक अन् मनोहर असते.
  2. पुणे स्टेशन, पाचची वेळ, मीही वरील कारणास्तव आलो होतो. त्या ठिकाणी एक निराळेच विश्व निर्माण झालेले पाहावयास मिळते. निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्या निरनिराळ्या वंशांच्या अनेक लोकांचा जनसागर असतो तो.
  3. मद्रासला जाणारी एक्स्प्रेस दिमाखाने स्थानकावर आली. एकच कोलाहल माजला. गाडीतून उतरणारे अन् गाडीत चढणारे यांची एकच धांदल माजली.
  4. लाल डगलेवाले हमाल, आपला ऐसपैस सामानाचा अन् संसाराचा डोलारा सांभाळणारे गृहस्थ, आपल्याच नादात असलेले एक प्रणयी युगुल असे त-हेत-हेचे लोक तेथे दिसत होते.
  5. जपून जा, पत्र पाठव या शद्वांची अश्रूच्या पार्श्वभूमीवर सारखी गर्दी होत होती. एक प्रेयसी आपल्या प्रियकरास निरोप देत होती. आघाडीवर लढाईस जाणाऱ्या जवानाला त्याचे वडील हसतमुखाने निरोप देत होते.
  6. विरहाची जाणीव देणारी गाडीची कर्कश्श शिटी वाजली. जीवनप्रवाह परत वाहू लागला. परत निघालो तो गाडी चुकलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसली.
  7. जीवनाचे सम्यक दर्शन देणारी गोष्ट म्हणजे स्टेशन. भिन्न संस्कृतीचे आगर म्हणजे स्टेशन. वि.द. घाट्यांच्या शद्वात सोशल इम्मार्टलिटीचे स्थान म्हणजे स्टेशन, मानवाच्या अनेकविध भावनांचा करुण, हास्य, शृंगार, अगतिकता, साशंकता, आतुरता, वत्सलता, विरह-रम्य आविष्कार स्टेशनाशिवाय एकाच वेळी इतरत्र दृष्टीस येणे जवळजवळ अशक्यच.
  8. जीवन म्हणजे गर्दी-घाई, जीवन म्हणजे धक्के खाणे नि धक्के देणे हे खांडेकरांचे वचन स्टेशनाशिवाय अन्य कशाला समर्पकपणे लागू पडेल ?
  9. म्हणून मला जेव्हा जेव्हा या गतिशील जीवनाचा घाई-गर्दीचा अन् यांत्रिकतेचा कंटाळा येतो तेव्हा तेव्हा, या स्टेशनाकडे मी धाव घेतो-आईच्या कुशीत धावणाऱ्या बालकाप्रमाणे.

११. शाळेचा निरोप घेताना

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) आज एक फर्मचा मी प्रमुख व्यवस्थापक आहे, फर्मच्या वाढीसाठी विकासासाठी मी जी धडपड केली त्याचा गौरवही झाला आहे. यशाच्या शिखरावर मी उभा आहे या यशाला कारण कोण ?
  2. शाळेचा निरोप घेण्याचा तो दिवस. शाळेविषयीच्या प्रेमाला मनात अलोट पूर आला होता. सीनिअर्स म्हणून एस्. एस्. सीच्या संबंध वर्षात आम्ही भाव खाल्ला होता, तो दिवस अन् त्यापाठीमागचे दिवस अजून आठवतात.
  3. सुरुवातीला त्या शाळेविषयी माझ्या मनात नावड होती; पण पुढे पुढे आम्ही सर्व मित्रमंडळी त्या शाळेविषयी बोलत असू. वक्तृत्वस्पर्धा क्रिकेट मॅचेस, स्नेहसंमेलन यात नेहमी मी आघाडीवर असे.
  4. अनेक अक्षम्य चुका घडत होत्या, पण शिक्षक क्षमाशील अंतःकरणाने आमच्या चुका सांभाळून घेत होते. आम्ही परत त्या करू नयेत हे पटवून देत. निरोप समारंभाच्या दिवशी हे सर्व, चित्रपटातील दृश्याप्रमाणे मनःपटावर चमकून गेले.
  5. त्या दिवसाचे वातावरण उदास होते. शाळेला विद्यार्थ्यांनी जो नावलौकिक मिळवून दिला आहे, तो स्पृहणीय अन् कौतुकास्पद असाच आहे. आपल्या भावी आयुष्यातही विद्यार्थ्यांनी असेच यश मिळवावे. पण त्यांनी शाळेला विसरू नये. तिचे ऋण हे मान्य करावयास हवे, असे मुख्याध्यापक म्हणाले.
  6. वर्गशिक्षकांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. सदाचाराची, योग्य मार्गाने जीवनाची वाटचाल करण्याची शिदोरी तेथेच मिळाली. एखादे अपरिहार्य पण कटू कर्तव्य करण्यासारखे त्या दिवशीचे सर्वांचे वागणे होते. मी खिन्न मनाने बाहेर पडलो.
  7. आज त्याच आठवणींना पूर येतो. अन् मन अस्वस्थ बनते.
  8. बालमनावर संस्कार करणारी शाळा म्हणजे दुसरी आईच असते. त्या आईचा निरोप घेताना मनाची विलक्षण अवस्था घर करून राहते.

१२. माझे पहिले भाषण

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) लहानपणापासून आमच्या मातापित्यांना आमच्याविषयी अभिमान ! आपला मुलगा बॅरिस्टर होणार ही तबकडी वारंवार परक्यापुढे वाजवली जाई. वक्तृत्व यासाठी आवश्यक म्हणून आम्ही वक्तृत्वकलेतील धडे गिरवू लागलो.
  2. लोकमान्यांच्या पुण्यतिथिनिमित्त पहिले भाषण देण्याचा मजवर प्रसंग आला. जय्यत तयारीनिशी व्यासपीठावर उभा राहिलो. वेश बावळा, धैर्याचा अभाव, जनसमुदायाची भीती यामुळे ‘विकेट’ जाणार असे वाटले. देवाचे नाव घेऊन सुरुवात तर उत्तम केली.
  3. भाषण रंगात आले. पाठांतर असल्यामुळे मी अस्खलित बोलत होतो. पंधरा मिनिटांचा अवधी. लोकमान्य न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकवीत होते. ती त्यांनीच काढली होती असे मी बोलून गेलो. परत घोटाळा लक्षात आला पण लोक ऐकत होते. मी तसाच बोलत राहिलो.
  4. बराच वेळ झाला तरी घड्याळाचा काटा पुढे सरेना. ते बंद आहे हे नंतर लक्षात आले अन् भाषण आवरते घेतले.
  5. या पहिल्या भाषणाने वक्तृत्वकलेतील महान तंत्र मला गवसले. ते म्हणजे भाषण याचा अर्थ निव्वळ थापेबाजी, आत्मविश्वासाची मात्र यास जोड हवी.

१३. आरसा नसता तर

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा तरी माणूस आरशात डोकावतो, सगळीकडे आरशांचे स्तोम माजलेले दिसते. दिवाणखान्यातील भव्य आरसा, पर्समधील इवलासा आरसा अस्तित्वाची जाणीव देतो.
  2. आरसा नसता तर मोठी पंचाईत आली असती, स्वतःचा चेहरा माणसाला पाहता आला नसता, स्वतःला ओळखता आले नसते.
  3. आरसा नसता तर सहकार्य वाढले असते, पितीजींची हॅट मुलाने ठीक बसवली असती अन् मुलाची टोपी पिताजींनी ठाकठीक केली असती.
  4. आरसा नसता तर रूपगर्वितांचा नक्षा उतरला असता. गडकऱ्यांच्या इंदुबिंदूचे दुःख सौम्य झाले असते.
  5. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला पद्मिनी दिसली नसती अन् पुढील युद्ध टळले असते.
  6. आरसा नसता तर माणूस अधिक सौंदर्यवादी बनला नसता. व्यवस्थित अन् ठाकठीक बनला नसता. आपण कसे आहोत हेच कळले नसते; मग व्यवस्थित राहणे दूरच.
  7. माणूस सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करतो स्वतःच्या रूपावर करतो, त्या रूपाचे लाड करतो. आरसा नसता तर हे प्रेम कमी झाले असते. अन् त्यातून काय काय उद्भवले असते हे सांगणे कठीण.

१४. विद्यार्थी जीवनात चित्रपटाचे स्थान :

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) चित्रपट ही आजच्या युगाची देणगी. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहू नये. असा चित्रपट पाहणारे आणि स्वतःचाच चित्रपट घडवणारे बडे लोक सांगतात.
  2. विद्यार्थी-जीवनात चित्रपटाचे स्थान निश्चितपणे आहे, पण विद्यार्थ्याने सर्रास अन् कोणतेही चित्रपट पाहावेत का ? हाच वादाचा प्रश्न.
  3. बरेच चित्रपट हे प्रेमाच्या भडक, किळसवाण्या दर्शनाने भरलेले असतात. प्रेमाच्या रमणीय चित्राऐवजी तेथे प्रेमाचे विडंबन झालेले असते, आजच्या आमच्या जीवनाचे काही अंशाने प्रतीक ठरणारे असे ते चित्र असते.
  4. अमेरिकन टीकाकार अर्नेस्ट बर्जर आजच्या आपल्या जीवनाचे मूल्यमापन करताना, आमच्या जीवनातील काव्याचे गद्यात रूपांतर झाले असते तर त्याचे मला वाईट वाटले नसते. पण आपल्या जीवनातील काव्याचे जाहिरातीच्या मसुद्यात रूपांतर झाले हेच खरे दुःख होय, असे आपले दुःख व्यक्त करतो.
  5. मानवी मनातील अक्षर, अमर, चिरनूतन अन् चिरतरुण श्रद्धांवर आधारलेले चित्रपट विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावेत. या चित्रपटांच्या रेलचेलीतून चोखंदळ, रसिक आणि समीक्षक दृष्टीने चित्रपट निवडले पाहिजेत.
  6. विद्यार्थ्यांच्या मनात स्फूर्ती निर्माण करणारी, त्यांच्या ध्येयाची पूर्ती होण्यास मदत करणारी, निराशेची पटले त्यांच्या मनावरून दूर करणारी चित्रपटसृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निश्चित निर्माण करील.
  7. चित्रपट हे शिक्षणाचे सर्वश्रेष्ठ माध्यम असते. या भूमिकेने चित्रपटाकडे पाहिले, तर विद्यार्थी-जीवनात चित्रपटाला मोठे मानाचे स्थान असेल, पण निदान आज तरी असे चित्रपट नाहीत अन् अशी दृष्टी दिसत नसल्याने आजच्या चित्रपटांचा विपरीत परिणामच अधिक होण्याची शक्यता दिसते.

१५. वाचनालयांचे महत्त्व

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) पशू, पक्षी आणि मानव यांतील बुद्धिमत्तेचा भेद महत्त्वाचा. त्यामुळे मानव उच्चतम आणि श्रेयस (Spiritual) जीवन जगू शकतो.
  2. ग्रंथ हे गुरू त्यांच्या सान्निध्यात मनातील मंगल, उदात्त, पवित्र भावना उफाळून येतात. त्याचे विकसन होते. षड्रिपुंना संयम घालण्याची शक्ती मानवाला मिळविता येते.
  3. वाचनाचा नाद म्हणजे ज्ञानाचा झरा. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ! ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते !’
  4. मानवी जीवनात संकटे येतात. मनाच्या कुरुक्षेत्रावर विचारांची शिष्टाई आणि विकार विलसित पाहावयास मिळतात.
  5. मानवी मनातील विकार प्रबळ झाल्यानंतर, मानव विनाशाच्या मार्गाकडे सत्वर वाटचाल करू लागतो. अशा वेळी ग्रंथ त्याला योग्य मार्गावर आणतात.
  6. मानवी जीवनातील स्थूल, सूक्ष्म, सोपे क्लिष्ट, गूढ-गूढतम असे प्रश्न या ग्रंथांच्या सहवासात सोडवता येतात.
  7. वाचनालय हे मंदिर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी तर आपली सारी धडपड या सर्वांच्या प्राप्तीसाठी सारख्याच प्रमाणात साहाय्यभूत होणारे हे ग्रंथराज होत.
  8. पिढी-पिढीतून चालत आलेले जीवनसार, संस्कृतिमूल्ये विचारवैभव ग्रंथाशिवाय पुढील पिढीला दुसरे कोण देते ?
  9. माणसाच्या मनात निर्माण झालेले अनेक कटू विचार, शल्ये, दुःखे क्षणार्धात नष्ट करण्याचे साधन म्हणजे वाचनालय.
  10. माणसाला ‘माणसांत’ आणणारी शक्ती म्हणजे वाचनालय.

१६. निसर्ग : एक कलावंत

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) या सृष्टीतील दिव्यपण। तेच तेच मनुजपण। “हे निसर्गाचे महात्म्य” निसर्ग हा थोर कलावंत आहे. सहा ऋतूंत तो आपली निरनिराळी छटा आपल्यासमोर दृग्गोचर करतो.
  2. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे ऋषी, मुनी सुखी आणि समाधानी होते कारण निसर्गातील भव्योदात्त सौदर्याचा त्यांना ठायी ठायी साक्षात्कार होत असे.
  3. अजिंठा, वेरूळची चेतोहारी आणि चारूपूर्ण लेणी, मनाची उंची वाढविणारा हिमालय, मनात हिरवटपणा निर्माण करणारी दाट आणि गर्द झाडीने युक्त अशी अरण्ये यांच्या रचनेत या कलावंताचे कौशल्यच प्रकट होते.
  4. ही सारी रचना स्वाभाविक अन् नवनवोन्मेषशाली. ओल्या पृथ्वीच्या, नव्हाळीच्या वाफा, नागांनाही मोहवणारा सोनचाफा, गालाच्या गुलाबांना लाजविणारे गुलाब ही सारी निसर्गाची किमया आहे.
  5. कलावंत जसा लहरी-तसाच निसर्ग लहरी आहे.
  6. कलावंत ज्याप्रमाणे शद्वरूपाने अनंत रूपे व्यक्त करतो तसेच निसर्गाचे.
  7. कलाविश्व जसे नवरसपूर्ण रुचिर, अभंग, दुःखातीत, मोहक अन् परिपूर्ण असते, तसेच निसर्गविश्व परिपूर्ण असते. अमर अपूर्व असते, तेथे दुःख नाही.

१७. माझा आवडता ललित लेखक

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) जीवनासाठी कला या तत्त्वाचा पुरस्कार आणि एकनिष्ठेने आचरण करणारा श्रेष्ठ कादंबरीकार श्री. वि. स. खांडेकर हेच माझे आवडते ललित लेखक, लघुनिबंध, टीकालेखन याही साहित्यप्रकारात लेखन.
  2. त्यांच्या साऱ्या कादंबऱ्या याच ध्येयवादाने भरलेल्या. ‘ययाती’ हा त्यांचा परमोच्च बिंदू ! जीवन ही गुलाबाची शय्या नसून ते धगधगते यज्ञकुंड आहे. या वास्तवतेची जाणीव त्यांच्या कादंबरीतून होते.
  3. कल्पनाकुबेर ही त्यांना मिळालेली पदवीही यथार्थच म्हणावी लागेल. त्यांच्या लेखनावर कृत्रिमतेचा, हळवेपणाचा आरोप केला जातो. पण या दोषांपेक्षा गुणच अधिक डोळ्यात भरतात.
  4. अतिरम्य, अद्भुतरम्य, असे जीवन ते चितारीत नाहीत. जीवनातील पवित्र भावनांवर त्याची श्रद्धा, समाजाविषयी त्यांना वाटणारी कळकळ दोन ध्रुवामधील बाप्पांच्या रूपाने अथवा ‘अश्रू’तील शंकर मास्तरांच्या मुखाने ते बोलून दाखवितात.
  5. त्यांचे इतर लेखनही असेच कल्पकतेने फुललेले, विचारधन अन् विनोदाची मधूनच कोमल आणि कोवळी झालर लावलेले आहे.
  6. जीवनासाठी कला’ या मताचे जीवन अधिक मंगल व्हावे, मोहक व्हावे. या मातीवर याच मातीच्या मानवाने अपूर्व स्वर्ग निर्माण करावा. या अंत:करणपूर्वक श्रद्धेने त्यांनी हाती लेखणी धरली.
  7. जीवनातील सारेच रस प्रिय करूण, शृंगार, वीर इ. रस अधिक प्रिय.
  8. जे शाश्वत, श्रेयस, महान, उदात्त असेल त्यांचे त्यांना विलक्षण वेड, त्याचाच सतत शोध-आणि वेध घेत असतात.

१८. बेकारीचा भस्मासुर

  1. ( Nibandh Lekhan In Marathi ) भारताला स्वातंत्र्य मिळाले. शिक्षणात वाढ झाली. खेड्यातला पाटील मंत्री झाला. बहुजनसमाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाला. अर्थार्जन करण्याबाबत मात्र त्याची मती गुंग झाली.
  2. आज चाळीस जागा भरावयाच्या असतील तर चारशे अर्ज येतात. तीनशे साठ लोकांच्या पदरी निराशा येते.
  3. शिक्षित झाल्यामुळे आपोआपच गरजा वाढतात. सामान्य दर्जाचे जीवन जगण्यास मन धजावत नाही.
  4. उद्योगधंदे म्हणावे तसे वाढले नाहीत.
  5. सुशिक्षितांनी कल्पनेत आपल्यासमोर एक विश्व निर्माण केलेले असते. त्याला बेकारीचा भस्मासुर भस्मसात करतो. कित्येक जण ही घोर निराशा संपवण्यासाठी मृत्यूला जवळ करतात.
  6. जीवनाला गती आलेली असल्यामुळे नुसते शिक्षण घेऊन बसावे म्हटले तरी चालत नाही, त्यातच वाढत्या महागाईची भर.
  7. ही बेकारी निर्माण झाली त्याचे मुख्य कारण प्रत्येक शिकलेल्या तरुणाला नोकरीच हवी असते, सुशिक्षित झाल्यावर शेतीवर, स्वतंत्र व्यवसायात पडणारी तरुण मने कमी. त्यामुळेच हा भस्मासुर अधिक भयंकर.
  8. आणखी एक कारण म्हणजे इंग्रजी राजवटीत जसे कारकून तयार करणारे एकसाच्याचे शिक्षण दिले जात असे, तोच साचा अद्यापही तसाच असल्याने एका विशिष्ट क्षेत्रातच बेकारी आहे. औद्योगिक शिक्षण घेतलेले, डॉक्टर, इंजिनियर यांच्या क्षेत्रात बेकारी नाही.
  9. म्हणून वाढत्या शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे शिक्षण घेतलेले तंत्रकुशल तरुण निर्माण झाले तर हा भस्मासुर जाणवणार नाही असे वाटते.

१९. दुष्काळ मानवी शक्तीला एक आव्हान

  1. ( Nibandh Lekhan In Marathi )आजवर मानवाने निसर्गातील बऱ्याच बलाढ्य शक्तीवर विजय मिळविला, पण आज पुष्कळ समस्यांनी मानवाला चिंताग्रस्त केले आहे. मानवी शक्तीला हे एक आव्हान आहे.
  2. दुष्काळ निवारण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे अन्नधान्यात वाढ व्हावयास हवी. या प्रश्नात आम्ही स्वयंपूर्ण झालो पाहिजे, याचे उत्तर आम्ही शोधले पाहिजे.
  3. अल्पसंतुष्ट, आळस, दैववाद आणि त्यातूनच निर्माण झालेली निराश वृत्ती, अद्ययावत अवजारांच्या वापराचा अभाव, बी-बियाणे आणि खते यांचा अभाव ही दुष्काळापुढे दुर्बल ठरण्यास साहाय्य करणारी काही कारणे.
  4. वरील सर्व गोष्टींचा आम्ही पुरवठा केला पाहिजे. या आव्हानाला चोख उत्तर देण्यास बद्धपरिकर झाले पाहिजे.
  5. मानवाची प्रगती झाली ती आव्हानातून, त्याच्या कर्तृत्वाला आव्हान दिले की, त्यात तो मन घालतो. दुष्काळ हेही अशाच प्रकारचे आव्हान आहे, त्यातून मानवाची शक्ती, प्रवृत्ती, प्रतिमा पणास लागते.

  1. अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया

२०. निबंध लेखनासाठी काही विषय

Nibandh Lekhan In Marathi :

  1. आयुष्यातील माझे ध्येय
  2. साहित्य आणि नीती
  3. मला आवडलेली व्यक्ती
  4. दारिद्रय: माणसाचा खरा मित्र
  5. देशपर्यटन
  6. करमणुकीची आधुनिक साधने
  7. पोस्टमन
  8. माझा छंद
  9. आला आषाढ-श्रावण
  10. ध्वज अविरत हा फडकेल!
  11. मातृदेवो भव!
  12. विसाव्या शतकाचे आत्मवृत्त
  13. सीमेवरील सैनिकाचे आत्मवृत्त
  14. साहित्याचे श्रेष्ठत्व
  15. स्टेशनवरील हमाल
  16. जनसेवा हीच ईश्वरसेवा
  17. हे विश्वचि माझे घर
  18. आमचे पूर्वज आमच्यापेक्षा सुखी होते काय?
  19. मानवापुढे निसर्ग नमला
  20. विद्यार्थी आणि समाजसेवा
  21. संग्रहाचे वेड
  22. दाढी
  23. मोठेपणाची हाव
  24. नवा स्त्री निर्माता
  25. भारताचे पहिले पंतप्रधान
  26. मानवते मानव आम्ही
  27. मला आवडणारी पुस्तके
  28. आमच्या शिक्षणपद्धतीतील उणीव
  29. माझ्या देशापुढील काही समस्या
  30. ललित वाङ्मयाचे स्वरूप आणि सामर्थ्य
  31. आता नको आम्हा व्यास, करू रणाचा हव्यास
  32. जुने जाऊ द्या मरणालागुनि
  33. या सृष्टीतील दिव्यपण, तेच तेच हे मनुजपण
  34. विद्या म्हणजे केवळ ज्ञान-रोजगार नव्हे
  35. जाहिरात: आजच्या जगाची पासष्टावी कला
  36. माझा बस स्टँडवरील अर्धा तास
  37. मातृभाषेचे महत्त्व
  38. वेळेचा सदुपयोग
  39. सहशिक्षण
  40. सदा शांती राहे वस्ती, तेथे खुंटे काळगती
  41. जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला
  42. शिस्त
  43. प्रभात
  44. २१ व्या शतकातील जग
  45. धर्म ही अफूची गोळी आहे
  46. धर्म हाच श्रेष्ठ गुरू
  47. विज्ञानाचे फायदे आणि तोटे
  48. आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे काय?
WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *